Buy Raw and Pure Honey Online

Buy Raw and Pure Honey Online
Connecting to your Roots

Wednesday, May 12, 2010

विठ्ठल कामत - महाड

मुंबईहून गोवा किंवा कोकणात जातानाचा पनवेल किंवा वडखळ नंतरचा हा थांबा चुकवू नका. महाड ओलांडल्यावर अगदी काही मिनिटांत डाव्या हाताला कामतांच हे हॉटेल तुमच्या स्वागताला सज्ज दिसेल .
पार्किंगसाठी भरपूर मोकळी जागा, बसण्याची चांगली सोय, नाश्ता व जेवणाचे भरपूर पर्याय आणि लांबच्या प्रवासातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छ स्वच्छतागृह ह्या सर्व गोष्टी इथे एकाच ठिकाणी आहेत.
इथे दक्षिणात्य पदार्थ छान मिळत असले तरी विठ्ठल वडा आणि बटाटेवडा खायला मात्र विसरू नका. विठ्ठल वडा हा देखील बटाटेवडाच पण दह्यात घातलेला. इथल्या वड्याबरोबर मिळणाऱ्या तीन प्रकारच्या चटण्याही लई भारी असतात. फार लांबचा पल्ला गाठायचा असेल तर इथे खायला थांबच कारण ह्या महामार्गावर नंतर फार चांगला हॉटेल लगेच लागत नाही.

श्रीदत्त कॉर्नर - पळस्पे फाटा

तुम्ही खाजगी वाहनाने कोकणात गेला असाल तर ह्या जागेविषयी वाचायची गरजच नाही. इथला वडा, मिसळ, शिरा, खरवस काही न काही तुम्ही खाल्लच असेल.
पनवेल पासून साधारण ३-४ कि मी पुढे गेल्यावर पुणे आणि गोव्याकडे जाणारे रस्ते जिथे वेगळे होतात त्या फाट्यावर श्रीदत्त कॉर्नर आहे.
सकाळ सकाळ कोकणात जायला निघणाऱ्या गाड्यांच हे ठरलेल नाश्त्याच ठिकाण. मग २ तासाचा प्रवास झाल्यावर हवाहवासा ब्रेक घेत सर्वच जन इथे थांबतात.
कोणी चहा घेत फ्रेश होत तर कोणी वडा, शिरा किंवा मिसळीवर ताव मारत. इथला खर्वसही छान असतो. हो पण खरवस मागितल्यावर भरपूर मिळेल अशी अपेक्षा मात्र ठेऊ नका :)
आणि पुढच्या प्रवासात खायला चकल्या, चिवडा आणि असेच काही पदार्थही येथून घेऊन निघता येईल तर मग पुढल्या वेळी कोकणात जाताना पनवेल पार केल्यावर ह्या कॉर्नरला थांबायला विसरू नका..

मुन्ना अन्डेवाला - दहिसर लिंक रोड

लिंक रोड दहिसरला जिथे संपतो त्याच्या दोनतीनशे मीटर्स अलीकडे डाव्या हाताला मुन्ना अन्डेवाल्याची टपरी आहे. इथे येऊन एकदा सर्व डिश ट्राय केल्याशिवाय अंड्यातून काय काय बनू शकते ते समजणार नाही. पहिल्यांदा भुर्जी किंवा ओमलेट खाऊ म्हणून आत शिरलेला माणूस मेनुकार्ड बघून थोडा गोंधळतो. चांगल्या १५-२० डिशेसची यादी तुम्हाला दिसते.
ओमलेट, भुर्जी, बोईल्ड एग ह्याशिवाय
अंड्याचा डोसा,
खिमा घोटाळा,
चीज हाफ फ्राय,
मसाला हाफ फ्राय,
राणी भुर्जी,
फ्रेंच टोस्ट असे अनेक पदार्थ नजरेस पडतात, आणि मग काय? मस्त मित्रांचा घोळका आणि एकानंतर एक येणारे गरमागरम पदार्थ अशी छान मैफिल जमते. ग्रुप मध्ये कोणाची गाडी असेल ती घेऊन मित्रांबरोबर या आणि गाडीच्या बोनेतवरच मस्त मैफिल जमवून सर्व पदार्थांचा आस्वाद घ्या. पण हो, इथे खायचं असेल तर ११ च्या आत यावा लागेल हे मात्र लक्षात ठेवा.
मग काय मोबाईल उचला मित्रांना कॉल करा आणि मुन्ना कडे मैफिलीचा बेत आखून टाका.

झाफरान मुघलाई खाण्याची मक्का

महात्मा फुले मंडई (crowford market) च्या अगदी बाजूलाच असलेलं हे छान हॉटेल म्हणजे मुघलाई पदार्थांच्या चाहत्यांसाठी स्वर्गच.. विशेष म्हणजे हे हॉटेल रात्रभर चालू असत.
किंबहुना रात्री दीड वाजला आणि pubs  बंद झाले कि इथला माहौलच बदलून जातो. बिर्याणी, कबाब, फिरनी, lobster, अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घ्यायचा असेल तर झाफरानला भेट द्यायलाच हवी.
वेगवेगळ्या मुघलाई दिशेस इथे मिळत असल्या तरी सर्वात भारी प्रकार म्हणजे रान बिर्याणी.. बकऱ्याच्या अक्ख्या पायाची ही बिर्याणी ऐकायला विचित्र वाटेल कदाचित पण एकदा खाल्लीत तर पुन्हा पुन्हा झाफारनकडे  तुमचे पाय आपोआपच वळायला लागतील.. पण एकटे किंवा जोडीने गेलात तर मात्र ही दिश मागवू नका, कारण एक रान बिर्याणी ४ जणांना तरी पुरते.
इथला खिमा पण नक्की तरी करा, आणि सर्वात मुख्य म्हणजे फिरनी न खाता बाहेर पडून समस्त खवय्या जमातींचा अपमान करू नका.
अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे मिळणारा मुखवास.. खायचे पान आणि त्यात घालायचा सर्व मसाला वाळवून केलेला मुखवास ही झाफरान ची अजून एक खासियत. तर असे हे हॉटेल तुमच्या ह्या वीकेंड च्या लिस्ट वर टाका आणि इथलं खाणं कसं वाटल ते मलाहीकळवा

Tuesday, May 11, 2010

गिरगावातले खाणीमान

एखाद्या जागेला जसे राहणीमान असते तसेच त्या जागेची बरेचदा खाद्यसंस्कृतीही असते. मग तो भाग भौगोलिकदृष्ट्या खूप मोठा असण्याची गरज नाही. गिरगावातले खाणीमानही असेच वेगळे आहे. कोकणातून आलेला ब्राह्मणवर्ग मुख्यता इथे वसला आणि त्यांच्या जोडीला नरीमन पोईन्ट  च्या भागात वसले पारशी. पुढे गुजराती लोकांच्या आगमनानंतर इथे ह्या तीनही संस्कृतींच्या संगमातून एक खाद्यसंस्कृती तयार झाली आहे. इराण्याचे हॉटेल, ब तांबे, विनय लंच होम, कोल्हापुरी चिवडा, सांडू, आइडिअल, कोना, आनंदाश्रम हि येथील खाद्यसंस्कृतीची काही प्रमुख केंद्रे शिवाय प्रकाश, कुटुंबसखी हि अनेक गीरगावाकारांना nostalgic करणारी ठिकाण आहेतच..
विनय ची उसळ आणि मिसळ, इराण्याचा ब्रून मस्का, ओमलेट, मावा सामोसा आणि पुडिंग, कुटुंबसखीचा वडा, शिरा आणि पोहे, कोल्हापुरीची उपासाची मिसळ, ताराबागेतील पाणीपुरी आणि प्रकाशचे पियुष अशा अनेक पदार्थांनी हि खाद्यसंस्कृती बहरली आहे.
तेंव्हा मुंबईत कुठे जायच आणि काय खायचं हा प्रश्न पडेल तेंव्हा सरळ गिरगावात या आणि ह्या खाद्यसंस्कृतीचा आणि त्याबरोबर चालसंस्कृतीचा आस्वाद घ्या ..